आज पुण्यात सर्वत्र गौरी पूजनाचा आनंद साजरा केला जात असताना, ऋणानुबंध सामाजिक संस्था (RSO) ने या उत्सवाला एक वेगळा रंग दिला आहे. वारजे माळवाडी येथील सुवर्णा ××× या विद्यार्थिनीने शैक्षणिक मदतीसाठी आमच्याकडे संपर्क साधला होता. सामाजिक कार्यकर्त्या ताईंनी सुवर्णाच्या परिस्थितीची चौकशी केली असता, तिच्या कुटुंबाची कठीण परिस्थिती समोर आली. तिच्या वडिलांचे तीन-चार महिन्यांपूर्वी निधन झाले असून, संपूर्ण घराची जबाबदारी तिच्या आईवर आहे, जी दुसऱ्यांच्या घरी जाऊन घरकाम करते.
सुवर्णाने पीएमसी शाळेतून आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते, पण आर्थिक अडचणींमुळे ती नववीत प्रवेश घेऊ शकली नव्हती. शिकण्याची तीव्र इच्छा असूनही, शाळेची फी आणि शैक्षणिक साहित्याची कमतरता यामुळे ती शाळेत जाऊ शकली नव्हती. मामासाहेब मोहोळ शाळेत उशिराने का होईना, तिचे प्रवेश झाला आहे, पण शालेय साहित्य नसल्यामुळे ती शाळेत जात नव्हती.
गौरी पूजनाच्या या पवित्र दिवशी, ऋणानुबंध संस्थेने या विद्यार्थिनीची दखल घेत, तिला शैक्षणिक साहित्य म्हणजेच वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास दिली, तसेच शाळेची फी सुद्धा संस्थेतर्फे भरली जाणार आहे. या प्रकारे, RSO ने एकेरी पालक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे लक्ष देत, त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला आहे.
मानवामध्येच देव शोधून, त्या देवाची सेवा करणे हाच संस्थेचा उद्देश आहे, आणि आज गौरी पूजनाच्या दिवशी सुवर्णा हिच्यासाठी केलेले कार्य याचा उत्तम उदाहरण आहे.
